मलकापूर (हॅलो बुलढाणा) मलकापूर शहरात भरदिवसा महिला शिक्षकिणीला लुटण्याची धक्कादायक घटना घडली आहे.शहरातील पदमालय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ. सोनल आशिष राठी (वय ४२), व्यवसायाने शिक्षिका, यांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तोंडी अहवालानुसार, ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
सोनल राठी या आपल्या १५ वर्षीय मुलगी रूषिकासह स्कूटीवरून खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यांनी GS मॉल, डागामार्ट आणि बुलढाणा रोडवरील दुर्गा प्लास्टिक येथे खरेदी केली. त्यानंतर त्या तुलसी ज्वेलर्स रोडने घरी परतत असताना सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर दोन अज्ञात इसम शाईन मोटारसायकलवर आले. त्यापैकी एकाने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता तर दुसरा काळ्या शर्टात होता. या दोघांनी स्कूटीसमोर गाडी अडवून, मागे बसलेल्या इसमाने सोनल राठी यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोन्याची पोत अंदाजे ७५ हजार रुपये किंमतीची जबरदस्ती हिसकावून नेली आणि आस्था हॉस्पिटलच्या दिशेने वेगाने पसार झाले.
घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, भरदिवसा महिलेला लुटण्याच्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनल राठी यांनी लगेच आपल्या पतीला घटनेची माहिती देत संध्याकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मलकापूर पोलिसांनी दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










