बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट! स्व. रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पत संस्था आणि स्व. रामभाऊजी लिंगाडे फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ५००० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन भव्य धान्य गोदामांचे लोकार्पण आज थाटात पार पडले.
चिखली रोड परिसरात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक गोदाम सुविधांचा शुभारंभ संस्थेचे माजी अध्यक्ष गोवर्धनदास भडेच यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे, या ठिकाणी ६० टन क्षमतेचा अत्याधुनिक धरमकाटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत या भागात अशा दर्जाची सुविधा नव्हती, त्यामुळे शेतकरी व व्यापारीवर्गासाठी ही दिवाळीची खऱ्या अर्थाने मोठी भेट ठरली आहे.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आमदार धिरज रामभाऊ लिंगाडे व उपाध्यक्ष विवेक गिर्हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे डायरेक्टर नितिन पातुरकर, राजेश देशलहरा, दीपक वर्मा, धनंजय देशपांडे, कैलास भडेच, गौतम बेगानी तसेच गोडाऊन बांधकाम कॉन्ट्रॅक्टर सतीश मेहेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेच्या वतीने लवकरच कोल्डस्टोरेज उभारण्याचाही संकल्प व्यक्त करण्यात आला असून, पुढील वर्षभरात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलतीच्या दरात कोल्डस्टोरेज सुविधा उपलब्ध होणार आहे.














