जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) ज्या दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, त्या दिवाळीतच एका कुटुंबावर काळाने निर्दयी आघात केला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील शुभम नामदेव हांडे (वय 23) या तरुणाचा गतिरोधकावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून, संपूर्ण जामोद शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही दुर्दैवी घटना 17 ऑक्टोबरच्या रात्री घडली. शुभम आपल्या वडिलांना दिवाळीच्या तयारीत मदत करण्यासाठी दुचाकीवरून जळगाव जामोदवरून जामोदकडे येत होता. मात्र, आदर्श ढाब्यासमोरील रस्त्यावरील स्पीड ब्रेकर त्याला जीवावर बेतला. दुचाकीवरील तोल गमावून शुभम रस्त्यावर आपटला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ स्थानिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी मृतकाचे काका मारुती हांडे यांनी पोलिसात तक्रार दिली असून, जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हेडकॉन्स्टेबल संजय वेरुळकर तपास करीत आहेत.
शुभम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 18 ऑक्टोबर रोजी जामोद येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दिवाळीचा उत्साह, सजावट आणि तयारी यामध्ये वाहतुकीची बेफिकिरी आणि अंधारात दिसत नसलेले स्पीड ब्रेकर किती घातक ठरू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे. प्रशासनाने आणि नागरिकांनी यापुढे तरी अशा दुर्घटना टाळण्यासाठी जागरूक राहणे अत्यावश्यक आहे.










