बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अंबाबारवा, चुनखेडी,शेंबा, रोहीणखिडकी या पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी विविध मागण्या सोडविण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.
अंबाबारवा, चुनखेडी, शेंबा, रोहीणखिडकी, ता. संग्रामपूर या पुनर्वसित गावातील रहिवाशांनी मागील वर्षी ९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व मागण्यांसाठी रितसर अर्ज सादर केलेला होता. त्यावर पाऊल न उचलल्याने १० ऑक्टोंबर २०२४ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. त्यावेळेस उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग अकोट. यांचे पत्रा नुसार आश्वासन देण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पत्रा नुसार पुनर्वसन संबंधित अडीअडचणी दूर करण्यासाठी उपविभागीय पुनर्वसन समिती गठीत करण्यात आलेली असून सर्व मुद्दे समितीसमोर ठेवण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु आतापर्यंत एकही मुद्दा निकाली काढण्यात आलेला नाही. काही मुद्यांवर काम सुरु असल्याचे कळाले आहे परंतु एका वर्षात पूर्ण काम होणे अपेक्षित होते.मात्र अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.
गावाचे पुनर्वसन सन मे २०१६ मध्ये झालेले आहे. वनविभागाच्या दिनांक ३ नोव्हेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार पुनर्वसित्त झालेल्या सर्व गावातील नागरिकांना समान मोबदला देण्यात आलेला नाही. नागरिकांच्या मागण्या वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. पुनर्वसन झाल्यानंतर सर्व नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले असून नागरिकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाचे पुनर्वसन मे २०१६ मध्ये करण्यात आलेले आहे. परंतु त्यासाठी लाभार्थी याद्या आणि संबंधित मोबदला रक्कम रु.१० लाख रुपये ही २००८ नुसार गृहीत धरण्यात आलेली आहे. १० लाख रुपये हे २००८ नुसार मुल्यांकन गृहीत धरल्यास २०१६ पर्यंत त्याचे मुल्यांकन कमीत कमी २० लाख रुपये व्हायला पाहिजे होते. परंतु २००८ च्याच मुल्यांकनानुसार रक्कम देण्यात आली आहे. १८ वर्षाच्या वरील गावातील काही लाभार्थी यांना गावाचे पुनर्वसन होऊन ८ वर्षेपूर्ण झाले आहे तरीही आजपर्यंत सुद्धा त्यांना ती रक्कम देण्यात आलेली नाही. राष्ट्रीयीकृत बँकेच्या बचत खात्याच्या व्याजानुसार सुद्धा ती रक्कम आज दुप्पट झाली असती. २००८ च्या मुल्यांकन जर २०१६ मध्ये बदलण्यात आले असते तर ती १० लाख रुपयाची रक्कम आज १६ वर्षानंतर मुद्दल किमतीच्या चौपट झाली असती. तरीही जे लामार्थी बाकी आहेत. त्यांना मूळ मोबदला रक्कम १० लाख रुपये आणि त्यावरील व्याजासहित रक्कम त्वरित देण्यात यावी. २००८ मध्ये झालेल्या सर्व्हे नुसार लाभार्थी याद्या तयार झाल्या होत्या आणि गावाचे पुनर्वसन मे २०१६ मध्ये करण्यात आले आहे. २००८ ते मे २०१६ च्या दरम्यान ज्या मुलींचे लग्न झाले आहे. त्यांना सुद्धा २००८ नुसार मोबदला मिळायला पाहिजे होता. कारण पुनर्वसन होईल म्हणून कोणीही लग्न थांबवू शकत नाही. त्यामुळे अशा सर्व मुलींना मुद्धा मोबदला द्यायच्या यादीमध्ये पात्र करण्यात याचे व त्यांना मोबदला देण्यात यावा. मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत पुनर्वसन झालेल्या अकोला व अमरावती जिल्ह्यातील सर्व गावातील नागरिकांना पुनर्वसन झालेल्या गावात असलेल्या त्यांच्या गांव नमुना ८ अ नुसार मोबदला देण्यात आलेला आहे. परंतु नागरिकांचे त्याबाबतीत आतापर्यंत सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलेले नाही. तरीही अंबाबारवा गावातील गांव नमुना ८ अ चे लवकरात लवकर सर्वेक्षण करण्यात येऊन देय मोबदला गावातील नागरिकांना देण्यात यावा, आदी १६ मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत राजेश केरसिंग मोरे,लालचंद नरसिंग मोरे, सचिन लक्ष्मण मुजालदा,नथू नुरला मोरे,
गोपाल भिलू मोरे,मदन गोपाल मुजालडा,
चंदरसिंग बारक्या मोरे आदी ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.














