बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सहकार क्षेत्रात सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या माँ जिजाऊ अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे! सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय ‘दिपस्तंभ पुरस्कार’ पटकावत संस्थेने आपल्या कार्यकुशलतेची झळाळी राज्यभर दाखवली आहे. तब्बल ३५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार करत, माँ जिजाऊ अर्बनने बुलढाण्याचे नाव सहकार नकाशावर अधिक उज्ज्वल केले आहे.
हा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार २०२४-२५ महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या वतीने डेनिसन्स रिसॉर्ट, गोकर्ण-महाबळेश्वर (कर्नाटक) येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, खासदार प्रभाकर कोरे, खासदार अण्णासाहेब जोले, माजी आमदार राहुल बोंद्रे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे, सचिव नितीन जाधव, कार्यकारी संचालक रामेश्वर साखरे आणि सरव्यवस्थापक मनोज तायडे यांनी संस्थेच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. संपूर्ण महाराष्ट्रातून पतसंस्थांचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, विश्वास आणि सदस्यसेवा यामुळे माँ जिजाऊ अर्बनने अल्पावधीतच घवघवीत यश संपादन केले आहे. तिसऱ्यांदा राज्यस्तरीय सन्मान मिळवून माँ जिजाऊ अर्बनने सहकार क्षेत्रात बुलढाण्याचा झेंडा अभिमानाने फडकवला असून, संस्थेच्या सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.