बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याच्या भूमीला अभिमान वाटावा अशी कामगिरी सोहम अतुल आसोले या तरुणाने साध्य केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (NDA) च्या 155 व्या कोर्ससाठी त्याची निवड झाली असून त्याने भारतामध्ये 82 वा क्रमांक (रँक) मिळवून बुलढाण्याचा गौरव वाढवला आहे.
14 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या NDA (1) 2025 परीक्षेत सोहमने नेत्रदीपक यश मिळवत अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, त्याची निवड भारतीय वायुदलाच्या (IAF) फ्लाईंग ब्रांचसाठी झाली आहे.लहानपणा पासूनच पायलट बनण्याचे स्वप्न डोळ्यांत बाळगलेल्या सोहमने अथक परिश्रम, शिस्त आणि दृढ निश्चयाच्या जोरावर ते स्वप्न साकार केले आहे.
सोहम हा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील अतुल आसोले हे शिक्षक म्हणून छत्रपती शाहू महाराज विद्यालय, पेनटाकळी येथे कार्यरत आहेत. कुटुंबातील आधार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पुण्यातील यशोतेज अकॅडमी येथील प्रशिक्षण यामुळेच हे यश शक्य झाल्याचे सोहमने नमूद केले.त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा अभिमानाने उजळला आहे. मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर कुणीही आपले स्वप्न साकार करू शकते, हे सोहमने आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.