धामणगांव बढ़े (हॅलो बुलढाणा) सध्या अनेक शेतकरी बांधव अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडले आहेत. अशा संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजात आहेत. मोताळा तालुकयातील धामणगांव बढेचे रविराज अशोक महाजन यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, या नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा एक कौतुकास्पद निर्णय 7 ऑक्टोंबररोजी 41 वा वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांनी 41 हजार रुपयांची रक्कम आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे.
रविराज अशोक महाजन यांचा मदत करण्याचा सामाजिक भान जपणारा निर्णय प्रेरक असा आहे.याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना पत्र देऊन धनादेश त्यांच्या स्वाधीन केला आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत केल्यामुळे रविराज महाजन यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची ही भावना निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.