धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा) धामणगाव बढे येथील पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कोल्हाळा बाजार येथे बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख १२ हजार ८५० रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला आहे. याप्रकरणी धामणगाव बढे पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत फिर्यादी रुषभ भिकमचंद बोहरा (वय २९, रा. कारंजा लाड) यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या माहितीनुसार, त्यांचे मामा सुभाष जैन यांच्या कोल्हाळा बाजार येथील घरी २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर २०२५ च्या दरम्यान ही जबरी चोरी झाली आहे.सुभाष जैन यांचे घर कुलूपबंद असताना, अज्ञात आरोपीने घराचे कुलूप डमी चाबीचा वापर करुन आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोने चांदीचे दागीने लंपास करून पोबारा केला. रोख रक्कम ६०,००० रुपये, सोन्याच्या पाटल्या दोन नग (४३ ग्रॅम, किंमत ४,०३,००० ), सोन्याची राखी (७८० मिली, किंमत २,३५० ), नाकातील नथनी (१.५ ग्रॅम, किंमत ८,०००), दोन सोन्याच्या अंगठ्या (४ ग्रॅम व ३ ग्रॅम, किंमत ३५,०००), चांदीचे ४ शिक्के (१० ग्रॅम, किंमत १,५००) आणि चांदीच्या पायातील दोन जुन्या चैनपट्ट्या (२० ग्रॅम, किंमत ३,०००),
चोरट्यांनी एकूण ५ लाख १२ हजार ८५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
फिर्यादी ॠषभ बोहरा यांच्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली अशी माहिती ठाणेदार नागेश जायले यांनी दिली.