बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आपली गुणवंत मुले डॉक्टर, इंजिनीअर व्हावीत, हे प्रत्येक गोरगरीब आई, वडिलांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी पुढाकार घेत आपल्या संकल्पनेतून ‘मिशन झेड’ (झेडईडीडी – झेड्पीज इंजिनीअर्स ॲण्ड डॉक्टर्स ड्रिमर्स) हा विद्यार्थ्यांच्या उंच भरारीचा उपक्रम एप्रिल २०२५ पासून जिल्हाभर राबविला आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालकांसह राज्यभरात कौतुक झाले. आता ‘मिशन झेड’चा बुलढाणा पॅटर्न राज्याच्या पटलावर येऊ पाहात आहे. नुकतेच पुणे येथे आयोजित शिक्षण परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सीईओ खरात यांनी सादरीकरण केले. याकडे सकारात्मकतेने पाहात शिक्षण क्षेत्रातील उपस्थित सर्वांनी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
महाराष्ट्रात ‘मिशन झेड’ची शासन स्तरावरून अमलबजावणी झाल्यास गरीबाघरची मुले डॉक्टर, इंजिनीअरच्या दिशेने गगन भरारी घेऊ शकतील, असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. शासनाने निश्चितच ‘मिशन झेड’चा बुलढाणा पॅटर्न राबवावा, अशी मागणीही यानिमित्ताने जिल्ह्यातून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रत्येकी ५० हजार अशी ५० लाखांच्या खर्चाची तरतूद करून सीईओ गुलाबराव खरात यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पर्यायाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे.
▪️प्रधान सचिवांनी घेतली दखल
१९ व २० सप्टेंबरला राज्यस्तरीय शिक्षण परिषद पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्रकल्प संचालक संजय यादव, संचालक राहुल रेखावार यांच्यासह २१ जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रधान सचिव देओल यांनी सीईओ गुलाबराव खरात यांनी राबविलेल्या उपक्रमाचे तसेच कर्तव्यनिष्ठतेची दखल घेत कौतुक केले. ‘मिशन झेड’बद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने राज्यात हा पॅटर्न लागू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
▪️९६ विद्यार्थ्यांचे नियमित क्लासेस
८५ ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या २९२ विद्यार्थ्यांची एमपीएससी, यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात आली. त्यातील ९६ मुलांची या मिशनसाठी निवड करण्यात आली. जेईई, नीट, सीईटीचे क्लास घेणाऱ्या संचालकांनीदेखील औदार्य दाखविल्याने बुलढाण्यातील पहेल इन्स्टट्यिूटमध्ये १३, खामगावातील गुंजकर क्लासेसवर २४, जळगाव जामोदच्या सरस्वती क्लासवर ३८ असे ९६ विद्यार्थी क्लास करीत आहेत.
▪️पहिल्या वर्षाची रक्कम अदा
अकरावीच्या वर्षात २५ हजार आणि बारावीत २५ हजार अशी सेस फंडातून एका विद्यार्थ्यासाठी ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या वर्षाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करून ती क्लासेसना अदा करण्यात आली आहे.














