शेगाव (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे. राज्यभरातून शासनाला मदतीचे आवाहन होत असताना अनेक उद्योगपती, संस्था फक्त घोषणा करून थांबल्या असताना श्री गजानन महाराज संस्थानने मात्र प्रत्यक्ष कृती करून दाखवली आहे. समाजकार्यात अग्रणी असलेल्या या संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल रु. १ कोटी ११ लाखांची थेट मदत दिली असून हा धनादेश दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक बांधिलकीत नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री संस्थानने पुन्हा एकदा दाखवून दिले की सेवा हीच खरी साधना आहे. राज्यभरातील लाखो भाविकांकडून मिळालेल्या देणग्या आणि श्रद्धेचे हे रूपांतर प्रत्यक्ष मदतीत करण्यात आले. शासन व प्रशासनाकडून मदतीच्या गजरातही जेथे अनेक मोठ्या संस्थांचा सहभाग नगण्य आहे, तेथे श्री गजानन महाराज संस्थानने पुरग्रस्तांसाठी दिलेला हा निधी नक्कीच धाडसी आणि आदर्शवत पाऊल मानले जात आहे. म्हणूनच भक्तांसाठी धावून आला शेगावीचा ‘राणा’!