सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/ बालाजी सोसे) तालुक्यात 27 सप्टेंबर दिवसभर, 27 सप्टेंबरच्या रात्री आणि 28 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत मुसळधार व ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. या अनिर्बंध पावसामुळे आधीच नुकसान झालेली पिके पुन्हा पाण्याखाली गेली असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. आता न्याय मागायचा कोणाकडे? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत – सरसकट कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी, प्रती हेक्टर किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, पंचनामे व सर्व्हेच्या नावाखाली वेळकाढूपणा थांबवावा आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे थकित पैसे तातडीने द्यावेत.
शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे की, जर सरकारने आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर शेतकरी कठोर आंदोलनाचा मार्ग अवलंबतील. गावोगाव शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत न मिळाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असून सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.










