चिखली (हॅलो बुलढाणा) शहरातील ग्रामदेवता श्री रेणुका माता नवरात्री उत्सव सोमवार, दि. २२ सप्टेंबर ते गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवात जिल्हाभरातून भाविक, विशेषत: महिला भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
नवरात्र हा धार्मिक उपवासाचा काळ असल्याने शहरातील देवी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी व भाविकांच्या श्रद्धेचा आदर व्हावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांनी केली. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर सुरू असलेली मांसविक्री भाविकांच्या भावना दुखावणारी असून, नगर परिषदेकडून नेमून दिलेल्या जागेतच मांसविक्री व्हावी तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांत ती पूर्णपणे बंद ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच शहरातील स्वच्छता, फवारणी आणि डेंग्यू-मलेरिया सारख्या रोगराईच्या प्रादुर्भावाबाबतही युवासेनेने आवाज उठवला. शहरात मच्छरांची वाढ प्रचंड असून फवारणी फक्त कागदोपत्री होत असल्याचा आरोप करण्यात आला. नवरात्री निमित्त मंदिर परिसरात व मुख्य मार्गांवर विशेष स्वच्छता व फवारणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागण्यांसाठी युवासेना शहरप्रमुख आनंद गैची व शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालून निवेदन दिले. चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. तथापि, नगर परिषदेकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास “शिवसेना स्टाईलने” उघड्यावर चालणारी मांसविक्री बंद करण्याचा इशारा आनंद गैची यांनी दिला.
या प्रसंगी माजी नगरसेवक शाम शिंगणे, उपशहरप्रमुख समाधान जाधव, रवी पेटकर, शंभु गाडेकर, अनिल जावरे, गणेश कुडके, बंटी कपूर, राहुल वरवंडे, सोहल शाह, सचिन जोशी, दिनेश गैची, प्रथमेश गैची, दिपक सोलाट, रोशन खान, रवि उबरहांडे, अतुल मगर, प्रल्हाद वाघ यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.