बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारण व सहकार क्षेत्रावर मोठी छाप सोडणाऱ्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी व डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री श्रीमती प्रभावती भास्करराव शिंगणे (वय ८५) यांचे आज सोमवार, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले होते. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या ‘काकू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभावतीताईंच्या जाण्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे पक्षाच्या अधिवेशनासाठी नाशिकला गेलेले असल्याने अंत्यसंस्काराची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. त्यांच्या निधनामुळे सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात असून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शोकसभा आयोजित होण्याची शक्यता आहे. प्रभावतीताईंच्या सहृदय स्वभावामुळे व सामाजिक कार्यामुळे त्यांनी जनमानसात विशेष स्थान निर्माण केले होते.