बुलडाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाच्या सेवा आता मोबाईलवर उपलब्ध! ‘सुलभ सेवा’ WhatsApp Chatbot च्या माध्यमातून उत्पन्न, जात व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रांसह अन्य सेवा आता एका क्लिकवर मिळणार आहेत. दरम्यान अवैध सेतू केंद्रावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज पत्रपरिषदेत दिला आहे.
शासनाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक महत्त्वाची डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ‘सुलभ सेवा’ व्हॉट्सॲप चॅटबॉट नागरिकांसाठी महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देणार आहे.हा चॅटबॉट नागरिकांना त्यांच्या मोबाइल फोनवरूनच तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती मिळवण्याची आणि त्या सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा देतो. नागरिकांना महसूल विभागामार्फत विविध प्रमाणपत्रे मिळवावी लागतात.या नव्या सुविधेत उत्पन्न प्रमाणपत्र, जात दाखला, नॉन-क्रिमीलेयर दाखला यांसह जिवंत सातबारा मोहीम आणि सलोखा योजना यासंबंधी माहिती, आवश्यक कागदपत्रांची यादी व अर्ज प्रक्रिया या चॅटबॉटद्वारे सहजपणे समजते. आणि सरकारी सेवा मिळविताना होणारी अडचण टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
▪️अशा मिळतील सुविधा
*प्रमुख सेवांची माहिती एका क्लिकवर..
आवश्यक कागदपत्रांची तपशीलवार यादी..
कोणत्या कार्यालयात किंवा संकेतस्थळावर अर्ज करावा याचे स्पष्ट मार्गदर्शन
सरकारी कार्यालयात न जाता घरबसल्या माहिती आणि अर्जाची सुविधा
▪️चॅटबॉटचा उद्देश..
‘सुलभ सेवा’ या चॅटबॉटचा प्रमुख उद्देश म्हणजे नागरिकांचा वेळ आणि प्रयत्न वाचवणे, प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि सेवा अधिक गतिमान करणे. मोबाइलच्या एका संदेशावर सर्व माहिती मिळाल्यामुळे नागरिकांची धावपळ आणि गैरसोय टळणार आहे.
▪️वापरण्याची प्रक्रिया..
‘सुलभ सेवा’ चॅटबॉट वापरण्यासाठी खूप सोपा आहे. फक्त ९४२३१८४८०४ हा क्रमांक व्हॉट्सअॅपवर सेवा करावा लागेल. त्यानंतर ‘Hi’ असा संदेश पाठवावा. अथवा क्यूआर कोड स्कॅन करूनही चॅटबॉट सुरू करता येईल. त्यानंतर पुढील सुविधांची माहिती मिळत जाते.