चांडोळ (हॅलो बुलढाणा) शिक्षकाचे आणि विद्यार्थी यांचे नाते घट्ट असते… विद्यार्थ्यांचा वेळ शिक्षकांसोबत जातो.. त्यामुळे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो. मात्र, जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेल्या शिक्षकाची बदली होते, तेव्हा विद्यार्थ्यांचे हृदय भरून येते. असाच काहीसा प्रकार चांडोळ गावातील धाड सर्कल मधील झेडपी शाळेत पाहावयास मिळालाय.
आवडते शिक्षक साबीर सर, उबेद सर व साहेजाद सर यांची बदली झाली आहे. शाळेवर रुजू झाल्या पासून त्यांनी काही दिवसातच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. याच दरम्यान त्यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला. मात्र, विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर आपले आवडते शिक्षक दुसऱ्या शाळेत जाणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. मग काय? आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. विद्यार्थी रडत असल्याचे पाहून शिक्षक देखील गहिवरले होते.या शिक्षकांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला.