बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपरिषदे अंतर्गत भीम नगरात गेल्या अनेक दिवसांपासून नाला तुंबत असल्याने हजारो लिटर दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. नगरपालिका व लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पावसाळी दिवसात सांडपाणी रस्त्यावर येणे म्हणजे सार्वजनिक आरोग्य धोक्यात सापडणे आहे. पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची साफसफाई करणे नगरपालिकेचे काम आहे. परंतु नगरपालिका केवळ म्हणायलाच नगरपालिका असून शोभेची वस्तू झाली आहे.
भीम नगरात पावसामुळेच नव्हे तर नेहमीच नाल्याचे पाणी तुंबल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. शिवाय तुंबलेल्या नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर येते संपूर्ण परिसरातील रस्त्यावर साचते. या नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अन्यथा नागरिक आंदोलनाचा पवित्र घेतील असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.