चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली शहरात आज संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. बाबू लॉज चौकात दोन सामाजिक कार्यकर्त्यांच्या समर्थक व नातेवाईकांत शाब्दिक वादातून अचानक हाणामारी सुरू झाली. क्षणात परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिस प्रशासनाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवले.
ठाणेदार संग्राम पाटील यांनी स्वतः घटनास्थळी हजर राहून दोन्ही गटातील प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करून परिस्थिती आटोक्यात आणली. त्यांच्या दक्षतेमुळे संभाव्य दंगल व मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी शहरात दंगाकाबू पथक पाचारण करून महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून नागरिकांना पोलिसांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. चिखली पोलीस प्रशासनाची वेळेवर व ठोस कारवाई तसेच स्थानिक पत्रकार बांधवांचे सहकार्य यामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली.