बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात तब्बल 400 कोटींचा आयकर घोटाळा उघड! नागपूर आयकर विभागाच्या पथकाने 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शहरातील “तोतया” CA च्या घरावर धाड टाकून संगणक, हार्ड डिस्क व महत्त्वाचे कागदपत्रे जप्त केली. या तथाकथित CA ने आपल्या “विष्णू निवास” येथून हजारो शासकीय कर्मचाऱ्यांचे फॉर्म 16 भरून बोगस क्लेम दाखल करताना 30% कमिशन उकळल्याचा आरोप आहे. तब्बल 2 हजारांहून अधिक रिटर्न्सद्वारे 400 कोटी रुपयांचा चुना आयकर विभागाला लावल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
इतका मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही या तोतया CA ला अटक करण्यात आलेली नाही, हे आश्चर्यकारक! बुलढाणा, पुणे व परिसरात कोट्यवधींची मालमत्ता जमवणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध कारवाई न केल्याने नागपूर आयकर विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात तडजोडीचे वृत्त वेगाने पसरत असून विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रीय भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणात फक्त तोतया CA नव्हे तर बोगस क्लेम करून करचुकवेगिरी करणारे शासकीय कर्मचारी देखील दोषी आहेत. इतक्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश होऊनही कारवाईला विलंब का? नागरिकांतून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असून, दोषींना तातडीने अटक व कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर बुलढाणा शहरात जोर धरत आहे.