spot_img
spot_img

15 लाख ते पाच कोटींपर्यंतचे बक्षिस! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान!’ – जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा ! – 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अभियान राबविण्यात येणार!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासकीय योजनांच्या प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय गायकवाड, तर अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात हे होते.
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळेमध्ये सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे, नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनंतकुमार नेमाने यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्हा परिषदचे विविध विभाग प्रमुख, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सरपंच, सर्व विस्तार अधिकारी व सर्व ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) संजय इंगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश तायडे, विस्तार अधिकारी व्ही बी राऊत, ग्रामपंचायत अधिकारी गणेश जायभाये, सुमित भोपळे, जिल्हा व्यवस्थापक (आरजीएसए) कौतिक पाडळे व ग्रामपंचायत विभागातील इतर कर्मचारी यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी चंद्रशेखर जोशी यांनी केले.

 

▪️15 लाख ते पाच कोटींपर्यंतचे बक्षिस!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे दि. 17 सप्टेंबर ते दि. 31 डिसेंबर, 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापनही केले जाणार आहे. या अभियानात सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना बक्षिस दिले जाणार आहे.
▪️ग्रामपंचायतींना चार स्तरांवर मिळणाऱ्या बक्षिसांचे स्वरूप

▪️तालुकास्तर :

प्रथम पुरस्कार 15 लाख, द्वितीय पुरस्कार 12 लाख, तृतीय पुरस्कार 8 लाख व विशेष पुरस्कार 5 लाख रुपये

▪️जिल्हास्तर :

प्रथम पुरस्कार 50 लाख, द्वितीय पुरस्कार 30 लाख, तृतीय पुरस्कार 20 लाख रुपये

▪️विभागस्तर :

प्रथम पुरस्कार 1.0 कोटी, द्वितीय पुरस्कार 80 लाख, तृतीय पुरस्कार 60 लाख रुपये

▪️राज्यस्तर :

प्रथम पुरस्कार 5 कोटी, द्वितीय पुरस्कार 3 कोटी, तृतीय पुरस्कार 2 कोटी रुपये

▪️पंचायत समितींना मिळणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप :

विभागस्तर :-

प्रथम पुरस्कार 1 कोटी, द्वितीय पुरस्कार 75 लाख, तृतीय पुरस्कार 60 लाख रुपये

राज्यस्तर :-

प्रथम पुरस्कार 2 कोटी, द्वितीय पुरस्कार 1.5 कोटी, तृतीय पुरस्कार 75 लक्ष रुपये

 

▪️जिल्हा परिषदांना मिळणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप!

राज्यस्तर :
प्रथम पुरस्कार 5 कोटी, द्वितीय पुरस्कार 3 कोटी, तृतीय पुरस्कार 2 कोटी रुपये

▪️समित्या स्थापन करण्यात येणार!

या अभियानांतर्गत विविध स्तरांवर संनियंत्रणासाठी ग्रामपंचायत ते राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या अभियानाचे मुख्य घटक हे सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जस समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवर संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे हे सात घटक असणार आहे.
या अभियानांतर्गत प्राप्त झालेले मुल्यमापन प्रस्ताव समित्यांकडून तपासले जाणार आहे. मुल्यमापन प्रस्ताव हे १० जानेवारी २०२६ पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ११ ते २६ जानेवारी दरम्यान तालुकास्तरीय मुल्यमापन, २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय मुल्यमापन, १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान विभागस्तरीय आणि संपूर्ण मार्च महिन्यात राज्यस्तरीय समितीकडून प्रस्तावांचे मुल्यमापन केले जाणार असून त्यानंतर पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून देण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!