बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा पोलीस दल गुन्हेगारांना त्यांच्या कारवायांवर वचक बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी तडीपार करण्यावर भर देत आहेत, ज्यामध्ये सराईत गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासून जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तडीपार केले जाते. ही प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत येते. अशीच तडीपाराची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशावरून धाड गावात करण्यात आली.या कारवाईत तब्बल 95 गुंडांना सण- उत्सवाच्या काळात तडीपार करण्यात आले आहे.
धाड गाव हे अतिसंवेदनशील म्हणून गणल्या जाते. उत्सवाच्या काळात या गावावर पोलिसांची करडी नजर असते. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांवर अंकुश लावण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत कलम 163 (2) भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत 5 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या दोन दिवसासाठी 95 गुन्हेगारांना एक सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते.दरम्यान ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाडचे ठाणेदार प्रताप भोस व त्यांच्या टीमने केली आहे.