बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) सुजाण नागरिक घडवण्याचे काम करणाऱ्या गुरुजनांना 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवले जाते.मात्र 5 वर्षे उलटूनही बुलढाणा जिल्हा परिषदे कडून आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणाच झाली नसल्याने शैक्षणिक वर्तुळात नाराजी व्यक्त होत असून, त्यामुळे यंदाचा शिक्षक दिन ‘दीन’ झाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या शाळांतून अध्यापनाचे कार्य करणारे अनेक शिक्षक दैनंदिन कामाव्यतिरिक्त विविध उपक्रमात सक्रीय असतात. गावच्या विकासकामातही त्यांचा पुढाकार असतो अशा शिक्षकांना पुरस्काराच्या रुपाने प्रोत्साहित करणे आवश्यक आहे़.यासाठी पंचायत समितीला तशी खर्चाची तरतूदही असते.
स्काऊट गाईड, आदिवासी विभागाकडील शिक्षक, महिला शिक्षिका, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक अशा पाच प्रवर्गातून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवून घेतले जातात. प्रस्ताव मागविले. मात्र गत 5 वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार रखडले आहेत. शिक्षकांनी प्रस्ताव देऊनही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नाही. होतकरू शिक्षकांची मेहनत व जिद्द यामुळेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होते. शिक्षकांचे हे योगदान लक्षात घेण्यासाठी सध्या मात्र कुणालाच वेळ नाही. त्यामुळे आजचा शिक्षक दिन ‘दीन’ झाला असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला आहे.










