बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पैशांची प्रचंड लालसा असणाऱ्या गावढाळा येथील आरोपी माधव मोतीराम पांढरे उर्फ पाटील याने असे काळे काम केले की, सबसिडीच्या नावावर शेडनेट उभारण्याचे आमिष देत बुलढाणा सह खामगाव तालुक्यातील 7 शेतकऱ्यांचे तब्बल 66 लाख 80 हजार रुपये घशात घालून फसवणूक केली.हेच नव्हे तर राज्यभर त्याने घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी या भामट्याला अटक केली असून, त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘हॅलो बुलढाणा’ कडे या प्रकरणाची पूर्ण जन्मकुंडलीच हाती लागली आहे. अटाळीच्या मोहन लक्ष्मण फडके यांनी तक्रार दिल्यानुसार, 27 ऑक्टोंबर 2021 ते 4 फेब्रुवारी 2025 दरम्यान आरोपीने शासनाची सबसिडी मिळवून देतो म्हणून त्यांच्या बँक अकाउंट मधील रक्कम माऊली एरिगेशन व भारत एरिगेशन या फर्मच्या नावावर वळती केली. अशाच अटाळी येथील तक्रारदारासह 7 शेतकऱ्यांची प्रत्येकी 13 लाखांनी फसवणूक केली. 2 एप्रिल 2025 रोजी रामटेक येथील आनंद खंते यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये माधव पाटील, युनियन बँकेचा मॅनेजर आशिष गोंडाणे आणि वसुली अधिकारी विश्वास लांबघरे याचा देखील समावेश होता.रामटेक मधील 4शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून बोगस कागदपत्रावरून प्रमुख आरोपीने कर्ज उचलले होते.आरोपी पांढरे पाटीलने ही रक्कम स्वतःच वापरली.अकोला येथील जिजाऊ बँकेतही 2022 मध्ये एकाच प्रकारच्या प्रोजेक्टसाठी सतरा व्यक्तींना मिळून 2.33 कोटींचे कर्ज मंजूर केले.प्रत्यक्षात कुठलाही प्रोजेक्ट उभारला नाही.यासंदर्भात सहकार आयुक्त व उपनिबंधक यांच्या अहवालात माधव पांढरे पाटील च्या सहभागाचा स्पष्ट उल्लेख आहे.खोटे शॉप ॲक्ट लायसन्स बनवत कागदपत्रे काढणे असा या आरोपीचा धंदा सुरु होता.या आरोपीने नागपुर येथील व्यवसायिक अतुल झोटिंग यांची 3.5 कोटी रुपयांनी फसवणूक केली असून एक फॉर्च्यूनर गाडीही खरेदी केली.बुलढाणा येथील डॉक्टर राजपूत व शशी मुळे यांच्याकडून कर्ज मंजुरीच्या नावाखाली 15 लाख रुपये उकळले. 10 लाख परत केले परंतु 5 लाख अजूनही थकीत आहेत.बँक कर्ज मंजुरी साठी कमिशन म्हणून पैसे वेगवेगळ्या खात्यामध्ये जमा करण्यात पांढरे पाटील चा हातखंडा असून यामध्ये एसीपी सुनील गोंडे यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप आहे.महालक्ष्मी इरिगेशन व अन्य कंपन्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा असून हप्त्यांमध्ये महागड्या वस्तू व गाड्या घेतल्याचा देखील आरोपीवर आरोप करण्यात येत आहे.सध्या मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून एसआयटी स्थापन झाली आहे.आरोपी माधव पांढरे ला पोलिसांनी अटक केली असून,त्याने फसवणुकीतून कमावलेली अफाट संपत्ती जप्त करण्यात येऊन फसवणूक झालेल्यांना रकमेची परतफेड करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.