बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गणेशोत्सवास केवळ धार्मिक चौकटीत न बसवता, त्याला सामाजिकतेची जोड देत लोकसहभागातून उपक्रम राबविणारे वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार भवनात बुधवार, 3 सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने थायरॉईड तपासणी शिबीर घेण्यात आले. अकोला येथील थायोकेअर लॅबच्या सौजन्याने झालेल्या या शिबीरात तब्बल 112 जणांची तपासणी झाली.
थकवा, सुस्ती, वजन वाढणे, हातपाय सुजणे, निद्रानाश यांसारख्या थायरॉईडच्या लक्षणांबद्दल जागृती घडविण्याच्या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले. वृत्तेश्वर मंडळाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबीराला बुलढाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तपासणीसाठी थायोकेअरचे तंत्रज्ञ सोनू पाटील यांना डॉ. भागवत वसे, अजय काकडे, पोहीत शिवरकर आदींचे सहकार्य लाभले.
उद्घाटनप्रसंगी निमा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन पडघान, स्फूर्ती क्लस्टर प्रमुख सुनिल भालेराव, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ. राजेश जतकर, डॉ. सचिन झगडे, जगदेवराव बाहेकर यांसह मान्यवर उपस्थित होते. वृत्तेश्वर मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत शिवसेना उबाठाच्या राज्य प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांनी विशेष भेट देत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.एकूण 111 जणांची तपासणी झाली असून त्यात 50 पुरुष व 62 महिला सहभागी झाल्या. शिबीर यशस्वी होण्यासाठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख अभिषेक वरपे, भूषण पंजाबी, आकाश भालेराव, तुषार यंगड, मो. फरजान आदींनी विशेष परिश्रम घेतले.