बुलढाणा/समस्तीपूर (हॅलो बुलडाणा) सोशल मीडियावरील ओळखीचं किती भयानक रूप घेऊ शकतं याचं धक्कादायक उदाहरण समस्तीपूर(बिहार) शहरात उघडकीस आलं आहे. चिखली तालुक्यातील रहिवासी योगेश सुरेश चौथे या तरुणाने एका विवाहित महिलेला फेसबुकवरून जाळ्यात ओढलं, तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर ब्लॅकमेलिंग करून तब्बल 25 लाख रुपये रोख व 263.8 ग्रॅम सोनं लाटलं. अखेर सायबर पोलिसांच्या चक्रव्यूहात अडकून आरोपीला बिहारच्या समस्तीपूरमधील मगरदह घाट येथील मॉलजवळून अटक करण्यात आली.
सहा वर्षांपूर्वी आरोपी आणि पीडितेची फेसबुकवर ओळख झाली. व्हिडीओ कॉलवर संवाद सुरू होताच आरोपीने महिलेचा विश्वास जिंकून तिला लहानसहान खर्चाच्या बहाण्याने पैसे मागायला सुरुवात केली.पुढे गरजेपेक्षा जास्त मागणी आणि नकार दिल्यावर त्याने खाजगी फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी महिलेने लाखो रुपये आणि मौल्यवान दागिने देत राहिली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वारंवार समस्तीपूरला येऊन पीडितेला गुपचूप भेटत असे आणि तिथेच रोख रक्कम व दागिने घेत असे.
प्रकरण अखेर महिलेच्या पतीला समजल्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. महिलेच्या आमिषावर आरोपी समस्तीपूरला आल्यावर पथकाने त्याला जेरबंद केले. आरोपीच्या मोबाईलमध्ये महिलांसोबतचे आक्षेपार्ह चॅट्स व फोटो सापडले असून त्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे.आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून या प्रकरणाने सोशल मीडियावरील आभासी नातेसंबंधांच्या धोक्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.