बुलढाणा (हॅलो बुलडाणा) २सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१३ साली झालेल्या अन्न औषध विभागातील आंदोलनातून रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.बुलडाणा शहरातील हमरस्त्यावरील मटणाचे दुकान हटवण्यासाठी तुपकरांनी अन्न विभागाचे सहायक आयुक्त घनश्याम दंदे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती, त्यावेळी हे आंदोलन खूप गाजले होते, हे विशेष..!
१२ वर्षापूर्वी बुलडाणा शहरातील क्रीडा संकुल रोड वरील, राजमाता चौक,सोळंके ले आऊट येथे मुख्य रस्त्यावर एका गृहस्थाने मटणाचे दुकान थाटले होते. सदर मटण दुकानाचा परीसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. प्रचंड वास व घाणीचे साम्राज्य परीसरात निर्माण झाले होते.मांस विक्री दुकान हे मांसविक्री दुकानाच्या नियमांची पायमल्ली करून सुरू होते. अन्न प्रशासन विभागाच्या कायद्यांना केराची टोपली दाखवत अन्न प्रशासन विभागाने परवानगी देण्याचा प्रताप केला होता, यात नगरपालिका प्रशासनही सहभागी होते. परीसरातील नागरिकांनी वारंवार नगरपालिका व अन्न -औषध प्रशासन विभागाला वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म होतं. कोणतीही कारवाई प्रशासनाने केली नाही अखेर व्यथित होऊन परिसरातील नागरिकांनी युवा नेते रविकांत तुपकर यांच्या कडे आपली व्यथा मांडली.
रविकांत तुपकर यांनी शहरातील नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, अन्न व औषध प्रशासन विभाग गाठला.अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त घनश्याम दंंदे व कार्यालय प्रमुख प्रशांत अजिंठेकर यांच्या कडे आक्रमक होत जाब विचारला. नागरिकांच्या समस्या समजावून का घेत नाही?? असा सवाल करत,नियमांच्या पायमल्ली वर तुपकरांनी बोट ठेवले. अन्न -विभागाच्या कार्यालयात तुपकरांमध्ये व सहायक आयुक्त घनश्याम दंदे यांचेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आक्रमक होत तुपकरांनी व कार्यकर्त्यांनी सहायक आयुक्तांना बेशरमचे झाड देऊन आंदोलन केले.प्रचंड घोषणाबाजी करून ठिय्या मांडला, यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना झटापट केली.रविकांत तुपकरांनी सहायक आयुक्त घनश्याम दंदे यांची जोरदार खरडपट्टी काढली.चिडलेल्या अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त घनश्याम दंंदे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात रविकांत तुपकर, राणा चंदन, महेंद्र जाधव, ज्ञानदेव हरमकार, गंगाधर तायडे , गजानन गवळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार केली. तुपकरांनी मला हात पाय तोडण्याची धमकी देऊन,मारहाण केली व शिविगाळ करत सरकारी कामकाजात अडथळा आणला.माझा हात ओढत ऑफिस बाहेर खेचले, स्पॉट वर जाऊन मटण दुकान सिल करायला सांगितले, बेशरमचे झाड देऊन अपमान केला असे आरोप तुपकरांवर केले. रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात १७ जुलै २०१३ रोजी भांदवि कलम १४३,१८६,३५३,५०४,,५०६ या कलमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हे प्रकरण गेल्या १२ वर्षापासून बुलडाणा जिल्हा न्यायालयात सुरु होते. आरोपींच्या वकील ऍड शर्वरी सावजी -तुपकरांचा व सरकारी वकिलांचा युक्तीवाद जिल्हा न्यायालयाने ऐकून घेतला.सर्व साक्षी पुरावे तपासल्या नंतर आज दि २ सप्टेंबर रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जी.संतांनी यांनी रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने शर्वरी सावजी -तुपकर यांनी प्रभावी युक्तीवाद केल्यानेच कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याची चर्चा न्यायालय परिसरात होती.या निर्णयानंतर बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले “आज अखेर सत्याचा विजय झाला.जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे गुन्हा आहे का..? कितीही खोट्या केसेस केल्या तरीही आम्ही डगमगणार नाही, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सामान्यांच्या हक्कासाठी ताकदीने लढत राहू, प्रसंगी वारंवार जेलमध्ये जाऊ,पण जनतेच्या प्रश्नावर कायम रस्त्यावर उतरू,असेही तुपकर म्हणाले.