केळवद (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील काही तालुक्यांसह चिखली तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची जमीन खरबडून गेली असून, पिकवलेली पिके उध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यातील केळवद येथील वैष्णवी रविकांत गाडेकर व संपूर्ण गाडेकर परिवार यांनी गौरी महालक्ष्मी जवळ अतिवृष्टीचा जिवंत देखावा साकारला आहे.
या देखाव्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, वाहून गेलेली शेते आणि शेतकऱ्यांची बिकट अवस्था याचे हुबेहूब चित्रण करण्यात आले आहे. मात्र या देखाव्यातून त्यांनी एक सकारात्मक संदेश दिला आहे –“अतिवृष्टी झाली तरी खचून न जाता शेतकरी बळीराजांनी नव्या जोमाने, नव्या उमेदीने शेतीला सुरुवात करावी.”शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्याबरोबरच शेतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून केला आहे. तसेच तेथे लावलेल्या फलकाद्वारे शासनाने सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
वैष्णवी गाडेकर यांनी सांगितले की, “गौरी महालक्ष्मी व गणपतीच्या आशीर्वादाने नक्कीच बळीचे राज्य येईल आणि शेतकऱ्यांचे जीवन पुन्हा फुलून येईल.”हा देखावा केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता समाजाला सकारात्मकतेचा, धैर्याचा आणि पुनर्निर्मितीचा संदेश देणारा ठरत असून, पाहणाऱ्यांकडून त्याचे भरभरून कौतुक होत आहे.