बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून बुलढाणा नगरपरिषदेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी 31 ऑगस्ट रोजी शेवटच्या दिवशी मुख्याधिकारी नगरपरिषद बुलढाणा यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी सात मुद्दे नमूद केले असून तीन मुद्द्याद्वारे मागणी सादर केली आहे.
त्यांनी दिलेल्या आक्षेप अर्जामध्ये नमूद केले आहे की,महाराष्ट्र शासनाने प्रभाग रचना करताना दिलेल्या संदर्भिय मार्गदर्शक सूचना यानुसार प्रभाग रचना करणे अपेक्षित होते. परंतु बुलडाणा नगर परिषदेतील प्रत्यक्ष प्रभाग रचना वरील मार्गदर्शक तत्वांचे पालन करून करण्यात आलेली नाही.
1) प्रभाग रचना सुरु करतांना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी, उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा, प्रभागांना क्रमांकही त्याच पध्दतीने द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहे. परंतु बुलडाणा नगर परिषदेने प्रभाग क्रमांक 1 ची रचना करताना उत्तरेकडून न करता वायव्य या उपदिशेपासून केली आहे. ( सोबत दिशा व उपदिशा प्रभाग रचनेचा नकाशा जोडला आहे.)
2)प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमांचे विचार (नदी, रस्ता, रेल्वे मार्ग, मोठे रस्ते इ.) करण्यात आलेले नाहीत. प्रभाग क्रमांक 1 , 10,11 आणि मधून राष्ट्रीय महामार्गामुळे जात असल्याने त्या प्रभागाचे तुकडे होत असून नैसर्गिक सीमांचा विचार करण्यात आलेला नाही.
3) प्रभाग रचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, सीमेचे वर्णन करताना रस्ते, रेल्वे, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे. असे निर्देश आहे.परंतु याची दक्षता घेण्यात आलेली नाही . प्रभागाची व्याप्ती स्पष्ट करतांना सीमा रेषांचे स्पष्ट दिशा निर्देश समजत नाही. उदा. शेत सर्वे नंबरचा जास्त प्रमाणात उल्लेख केलेला असल्याने आणि नागरिकांना शेत सर्वे माहिती नसल्याने सीमा दिशा निर्देश समजत नाही. याऐवजी प्रचलित शेत, इमारत मालकाचे नाव, चौकाचे, रस्त्यांचे नाव वापरलेले नाही. या ऐवजी प्रसिद्ध लँडमार्क वापरण्याचे नगरपरिषदेने टाळल्याने नागरिकांना सीमा कळू नये हा नगर परिषदेचा उद्देश स्पष्ट होतो. प्रभाग क्रमांक 7 व 8 या प्रभागांची सीमा रेषा स्पष्टच होत नाही. यातील प्रभाग क्रमांक 8 ची पश्चिम बाजूचे वर्णन करतांना “गुरांच्या गोठ्यापासून अशी सुरुवात केल्याने नगर परिषदेकडे चांगल्या लँडमार्काची वानवा असल्याचे स्पष्ट होत आहे.
4) प्रभाग रचना करताना लोकसंख्या व प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या आटोपशीर व्याप्ती या दोन मुख्य गोष्टी असल्या तरी नागरिकांच्या सामायिक हिताकरिता खालील बाबी विचारात घ्याव्यात.त्यासाठी प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश असताना विदर्भ हौसिंग सोसायटी ही एकच कॉलनी असताना तिचे जाणीवपूर्वक कुणाला तरी फायदा व्हावा या उद्देशाने तिचे विभाजन करून दोन प्रभागात एकाच वस्तीचे विभाजन करण्यात आले आहे.
5) अनुसूचित जाती/जमातीच्या वस्तींचे अन्यायकारक विभाजन झाले आहे. शहरातील सर्वच अनुसूचित जाती आणि जमातीच्या वस्त्या दोन वेगवेगळ्या प्रभागात घेतल्याने अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांची मते विखुरली जावी हा उद्देश स्पष्ट झाला आहे.
6) नागरिकांच्या दैनंदिन सोयीसुविधांचा व शासकीय/सामाजिक संस्थांचा योग्य विचार केलेला नाही.
7) प्रभागांमध्ये लोकसंख्या संतुलनाचे निकष पाळलेले नाहीत.
▪️अशी आहे मागणी!
1) सदर प्रभाग रचना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार फेरविचार करून दुरुस्ती करावी.
2) नागरिकांचा न्याय्य सहभाग व सुविधा लक्षात घेऊन नवी प्रभाग रचना जाहीर करावी.
3) स्थळ निरीक्षण न केल्याचे निदर्शनास येत असल्याने शहरातील सर्व प्रभाग रचनेवर आक्षेप आहे. अश्या प्रकारचे लेखी आक्षेप भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी नोंदवून बुलढाणा नगरपरिषद प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे.