चिखली (हॅलो बुलडाणा) ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ या घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस जिल्ह्यात चांगलाच गाजला. चिखलीत तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे पीए विद्याधर महाले यांच्या आदेशाने काँग्रेसचे फलक काढण्यात येऊन उपक्रमात अडथळे निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन केला आहे. विद्याधर महाले यांच्या पत्नी आमदार श्वेता महाले ह्या वोट चोरीमुळे निवडून आल्याचे सिद्ध झाल्याचे बोंद्रे म्हणालेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तत्पूर्वीच वोट चोरीची वाट दाखवून दिली होती. ते या संदर्भात देशभर जागर करीत आहेत.दरम्यान
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात काँग्रेस कडून ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ हा उपक्रम ब्लॉक व तालुकास्तरावर राबवण्यात आला.मात्र भाजपाने या उपक्रमात अडथळे निर्माण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्सनल पिए तथा चिखली मतदारसंघातील आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांनी चिखली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांचेवर दबावतंत्राचा वापर करत ‘मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी’ हे उपक्रमातील परवानगी घेऊन लावलेले बॅनर जबरदस्तीने काढून घेण्याचे फार्मान सोडले. त्यामुळे सर्व बॅनर काढून घेण्यात आले, आयोजकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे हा मुख्याधिकारी भ्रष्टाचारी आहे आणि भाजपाचा कार्यकर्ता असल्यासारखा वागतो,असा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वोट चोरी रोखण्यासाठी,
लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी देशभर जनजागृती करीत आहेत.आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे पीए विद्याधर महाले सातत्याने पदाचा दुरुपयोग करतात आणि पुन्हा एकदा पदाचा दुरुपयोग केल्याने स्थानिक भाजपा आमदार ह्या वोट चोरीमुळे निवडून आल्याचे सिद्ध झाले आहे,असे राहुल बोंद्रे म्हणाले.