spot_img
spot_img

साप चावल्याने ८ वर्षीय आरोहीचा मृत्यू – आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणाने कोमल जीवाची आहुती! केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या तालुक्यातच ‘सर्पदंश उपचार केंद्र’ फक्त कागदावरच?

मेहकर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील खंडाळा देवी गावात घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. संतोष पडघान यांच्या आठ वर्षीय चिमुरडी आरोहीला सर्पदंशाने प्राण गमवावे लागले. २९ ऑगस्टच्या पहाटे साडेतीन वाजता घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव हादरले असून संतापाचा सूर चढला आहे.

सणासुदीच्या सुट्टीत हॉस्टेलवरून घरी आलेली निरागस आरोही काही दिवसांपासून तापाने त्रस्त होती. रात्री अचानक ती उठून “गालावर काहीतरी चावलं, मला चक्कर येते…” असे म्हणाली. काही क्षणात तिच्या डोळ्यांचा पांढरपणा वाढला आणि जीवघेणा प्रसंग घडला. कुटुंबीयांनी धावाधाव करत प्रथम खाजगी दवाखान्यात, नंतर मेहकर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.तपासणीत तिच्या गालावर सर्पदंशाच्या खुणा आढळल्या. एवढे सर्व घडूनही तालुक्यात किंवा गावाजवळ तत्काळ उपचार सुविधा नसल्याने एका चिमुरडीचा बळी गेला. केंद्रीय आयुष मंत्री बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा तालुका/कर्मभूमी असूनही “सर्पदंश उपचार केंद्र” फक्त कागदावरच आहे, हेच आरोहीच्या मृत्यूचे खरे कारण असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

एका लहानग्या बालिकेचा जीव गमावणे ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेची शोकांतिका आहे. ग्रामीण भागात तात्काळ प्रतिविष उपलब्ध नसणे आणि आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी यामुळे कित्येक जीव दरवर्षी अशा प्रकारे अकाली विझतात.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!