मलकापूर (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुकारलेला लढा आज मलकापूरात पेटला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. पिकविमा १००% द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, विवरा गावातील सोलर कंपनीचे अतिक्रमण हटवावे, ज्वारी खरेदी सुरू करावी, तसेच कापूस–सोयाबीन आयात-निर्यात धोरणात तातडीने बदल व्हावा, अशा मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला.
तुपकरांनी सरकारवर थेट हल्लाबोल करताना स्पष्ट इशारा दिला – “ही शेतकऱ्यांची दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर रस्त्यावर उतरून निर्णायक संघर्ष छेडू.” कापसावरील आयात शुल्क हटवल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी केली. तर सोयाबीनला रास्त भाव मिळावा यासाठी सोयापेंड निर्यातीस परवानगी द्यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
मोर्चात मलकापूरसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जनता चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. शांततेत पार पडलेल्या या आंदोलनात प्रशासनाला इशारा देण्यात आला की, “पिकविमा आणि कर्जमुक्तीबाबत ठोस निर्णय न झाल्यास पुढचे आंदोलन आक्रमक होईल.”मोर्चाच्या आयोजनाची जबाबदारी अमोल राऊत व सचिन शिंगोटे यांनी पार पाडली. यावेळी सचिन पांडुळे, दामोदर शर्मा, गजानन भोपळे, विश्वास पाटील यांसह अनेक शेतकरी नेत्यांची उपस्थिती होती.