बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले आहे. चिखली तालुक्यातील वाघापूर ते रायपूर या रस्त्यावर पावसाने डांबरच वाहून गेले असून रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. फक्त एक वर्षापूर्वीच या रस्त्याचे सव्वा कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण झाले होते. मात्र, आज रस्त्यावर डांबराचा मागमूसही शिल्लक नाही, फक्त गिट्टीच गिट्टी दिसत असल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. ठेकेदाराने कमी दर्जाचे साहित्य वापरले, डांबरही माफक प्रमाणात टाकल्याने पावसाचे पहिलेच पाणी रस्त्याला पोखरून गेले. परिणामी रस्ता खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघातांचाही धोका वाढला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्वा कोटी रुपयांचा खर्च करून काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची दुर्दशा पाहता हा पैसा पाण्यात गेल्याचे स्पष्ट होते. रस्ता तुटल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भ्रष्ट ठेकेदार व निष्क्रिय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संबंधित ठेकेदाराला काळ्या टाकून कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रश्न असा की – सव्वा कोटींच्या रस्त्याचे एवढ्या कमी अवधीत झालेले ‘पाणी’ पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (PWD) झाकून ठेवणार की दोषींवर खरंच कारवाई करणार?