spot_img
spot_img

💥EXCLUSIVE अवैध रेती वाहतुकीने घेतला बळी – कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार? रेती तस्करांना तहसीलदारांची छत्रछाया? मृतकाच्या नातेवाईकांचा आरोप!

संग्रामपूर (हॅलो बुलडाणा) तालुक्यात दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या अवैध रेती तस्करीचा बळी अखेर एका गरीब मजुराला द्यावा लागला आहे. शनिवारी (२३ ऑगस्ट) रात्री १० वाजताच्या सुमारास संग्रामपूर–वरवट बकाल रस्त्यावर रेतीने भरलेल्या दोन ट्रॅक्टरने केळी वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आयशरमधील क्लीनर वाहनाखाली दबून जागीच ठार झाला. या घटनेनंतर अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्याऐवजी महसूल विभागाचे संशयास्पद मौन पाहायला मिळत आहे.आयशर मालकाच्या फिर्यादीनुसार केवळ एका ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र दुसरा ट्रॅक्टर मात्र “दारातून सुटला” याबाबत तालुक्यात तीव्र चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाने अजूनही या दोन्ही वाहनांवर महसुली कारवाई केली नाही. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या छत्रछायेखालीच दररोज रात्री-दिवसा उघडपणे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचा थेट आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.

महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनीच जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर एनपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना हे आदेश संग्रामपूरात पाळले जात नाहीत, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. गरीब कुटुंबातील एका मजुराचा बळी गेला, याला जबाबदार कोण? प्रशासन कारवाई करणार की प्रकरण रफा-दफा करणार?

दरम्यान, या प्रकरणी बुलडाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आणि जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी सखोल चौकशी केली जाईल असे सांगितले आहे. मात्र, या आश्वासनावर जनता विश्वास ठेवेल का? अवैध रेती तस्करीचा राक्षस थांबणार की पुन्हा कुणाचा जीव जाणार, हा खरा प्रश्न आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!