मेहकर (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी म्हणजे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२० मधील तरतुदींनुसार विधानसभेच्या अध्यक्षांना दोन आमदारांना सिनेटवर नियुक्त करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ही ऐतिहासिक नियुक्ती जाहीर केली.
विशेष म्हणजे आमदार खरात यांचा शिक्षणक्षेत्राशी असलेला जुना आणि थेट संबंध या नियुक्तीमुळे पुन्हा अधोरेखित झाला आहे. सन २०१५-१६ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागात सहसचिव पदावर कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ तयार करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. या अधिनियमामुळे राज्यातील विद्यापीठांना आधुनिक व रोजगाराभिमुख शिक्षणाची नवी दिशा मिळाली. आता त्याच अधिनियमाच्या कक्षेत आमदार खरात स्वतः सिनेट सदस्य म्हणून योगदान देणार आहेत, ही परिस्थिती शिक्षणक्षेत्रात परिवर्तनाची नवी दारे उघडणार आहे.
सिनेट हे विद्यापीठाचे सर्वोच्च धोरणात्मक व निर्णय घेणारे व्यासपीठ असून शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या धोरणांत सिनेटचा निर्णायक सहभाग असतो. त्यामुळे सिद्धार्थ खरात यांची नियुक्ती केवळ औपचारिक नसून शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील निर्णय प्रक्रियेला थेट दिशा देणारी ठरणार आहे.
मेहकरच्या जनतेला याचा अभिमान वाटतोय. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांच्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठ आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कायद्याची जाण असलेला अधिकारी आता आमदार म्हणून थेट विद्यापीठ धोरण ठरवणाऱ्या पदावर विराजमान झाल्याने, पुढील काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलांची नांदी या नियुक्तीतून सुरू झाली आहे, यात शंका नाही!