बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपालिका बुलढाणा अंतर्गत शहरासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी नेमलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे व सीएसआर दराप्रमाणे देण्यात यावे तसेच मुस्लिम बांधवांच्या परिसरामध्ये नपाचे कामगार दिल्यामुळे कामगारावर झालेला खर्च कंत्राटदारांच्या रनिंग बिलामधून वसूल करण्यात यावा,अशी मागणी अखिल भारतीय मजदूर संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सफाई मजुरांच्या मागण्यांना समर्थन दिले आहे.
न.प. बुलढाणा अंतर्गत कुमोदिनी रिसोर्सेस वाशिम यांना साफ सफाईचा कंत्राट देण्यात आलेला आहे. परंतु ते मुस्लिमबांधवांच्या भागात साफसफाईला जात नाही. त्या ठिकाणी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनिल बेंडवाल व बावने हे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून सफाईचे काम करुन घेत आहे.
वास्तविक पाहता कुमोदिनी रिसोर्सेस ला संपूर्ण शहराचा साफसफाईचा कंत्राट देण्यात आलेला आहे. तर कंत्राटदार मुस्लिम भागात साफसफाईला का जात नाही? आणि जर मुस्लिम भागातील साफसफाई नगर परिषदेचे कर्मचारी करत असेल तर त्या भागामध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कंत्राटदाराचे रनिंग बिलातून कपात करणे आवश्यक आहे. परंतु असे होत नाही. सुनिल बेंडवाल व बावने हे कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशाने मुस्लिम भागात काम करीत आहे? या बाबीची चौकशी तात्काळ करावी व मुस्लिम भागामध्ये नगर परिषदेचे जितके कर्मचारी काम करीत आहे तितक्या कर्मचाऱ्यांचा पगार कंत्राटदाराचे रनींग बिलामधुन कपात करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदार हे कंत्राटदाराचे कर्मचाऱ्यांना किमान वेतन प्रमाणे वेतन देत नाही.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य न केल्या तर 8 सप्टेंबर रोजी बुलढाणा ते मुंबई पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून चर्चा करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.