चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) इस्लाम धर्माचे प्रेषित, मानवतेचे संदेशवाहक मोहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्या जयंतीनिमित्त चिखलीत समाजहिताचा भव्य उपक्रम राबवला जात आहे. मुस्लिम फाउंडेशन आणि हजरत टिपू सुलतान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी होत असून, नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.इस्लाम धर्मानुसार १२ रब्बीउल अव्वल हा अत्यंत पवित्र दिवस. पैगंबर मोहम्मद यांनी जगाला दिलेला शांती, प्रेम, आपुलकी, दया आणि करुणेचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार मानवतेसाठी योगदान देण्याचा मार्ग दाखवण्यासाठी दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. रक्तदान म्हणजे केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर मानवतेला दिलेली खरी सेवा आहे. रक्त कृत्रिम पद्धतीने तयार होत नाही; ते केवळ दानातून मिळते. एका रक्तदात्याच्या थेंबातून अनेकांचे जीव वाचतात आणि हीच खरी पैगंबरांच्या शिकवणीची प्रेरणा आहे.
मुस्लिम फाउंडेशन व हजरत टिपू सुलतान ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाने गेल्या पाच वर्षांत असंख्यांना जीवनदान दिले आहे. या वेळीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान करून आपण केवळ एका रुग्णाचे प्राण वाचवत नाही, तर पैगंबर मोहम्मद यांनी दिलेल्या मानवतेच्या, करुणेच्या संदेशाला मूर्त रूप देतो.चिखलीत होणाऱ्या या भव्य रक्तदान शिबिरात तरुणाईसोबत सर्व समाजघटकांनी पुढे यावे, रक्तदानाच्या या पुण्य मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.