देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरकुल योजनेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून आवास योजनेत गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याविरुद्ध प्रशासकीय चौकशी लावून कठोर कारवाईची मागणी शिवसेना नेते रवींद्र विठ्ठलराव इंगळे यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात शिवसेना नेते रवींद्र इंगळे यांनी नमूद केले आहे की, देऊळगाव राजा पंचायत समिती अंतर्गत आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबविली जात आहे. मात्र सदर प्रक्रियेमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करता घरकुलांसाठी निधी वितरीत केला गेला आहे. या योजने च्या दृष्टीने गरजू असलेले खरे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ न देता आर्थिक देवाण-घेवाण करून नियमात न बसणाऱ्या धन दांडग्या लोकांना घरकुल देण्यात आले आहे. सदर योजनेत शासकीय निमशासकीय कर्मचारी, पंचायत समिती, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमबाह्यरित्या घरकुल देण्यात आले आहे. सदर बाब गटविकास अधिकारी व ग्रामीण अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी उडवा ओळीची उत्तरे दिल्याचा आरोप रवींद्र इंगळे यांनी सदर निवेदनाद्वारे केला आहे. तालुक्यात झालेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. सदर प्रकरणात येत्या 30 ऑगस्टपर्यंत चौकशीला सुरुवात करण्यात आली नाही तर पंचायत समिती कार्यालयाला ताला ठोकू असा इशारा शिवसेना नेते इंगळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.