चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली शहरात दहशत माजवणारा आणि वारंवार गंभीर गुन्ह्यात अडकलेला गजानन उत्तम जाधव उर्फ बिझनीस अखेर पोलिसांच्या तावडीत आला आहे. चहा हॉटेल व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवून जबरीने पैसे लुटण्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी अनिल ओंकार जाधव (वय 22, रा. गोरक्षणवाडी, चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी ते धान्य मार्केटमध्ये चहाची ऑर्डर देऊन बाहेर पडताच आरोपी बिझनीसने त्याच्या पोटाशी चाकू लावून खिशातील पैसे देण्याची धमकी दिली. त्याने फिर्यादीच्या खिशातील तब्बल 1500 रुपये हिसकावले. विरोध केल्यावर फिर्यादीला चापटाबुक्यांनी मारहाण केली व हातातील चहाचा थर्मास हिसकावून त्यातील चहा फिर्यादीवर फेकल्याने त्याचा हात भाजला. याशिवाय आरोपीने थर्मास फोडून 500 रुपयांचे नुकसानही केले.
फिर्यादीची तक्रार मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक राबविण्यात आले. तपासदरम्यान आरोपी गोरक्षणवाडी येथे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून लुटलेले 1500 रुपये व गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला.
बिझनीस हा अट्टल चोरटा असून याआधीही त्याच्यावर खूनाच्या प्रयत्नापासून ते दरोड्यापर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. त्याविरोधात 2016 पासून 2025 पर्यंत चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बुलडाणा जिल्हा कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात पोउपनि. समाधान वडणे, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, विकास देशमुख, संतोष जाधव, प्रशांत धंदर, पंढरी मिसाळ, अमोल गवई, निलेश सावळे व राहुल पायघन यांनी केली.