बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जुन्या वादातून सैलानी येथे पहाटे झालेल्या थरारक खून प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली. इंदिरा नगर येथील ऑटोचालक शेख नफिज शेख हाफिज (38) याचा धारदार शस्त्राने निर्दय खून करण्यात आला. बरीवाले बाबा दर्ग्याजवळील झोपडीसमोर शनिवारी, 23 ऑगस्ट रोजी रात्री 12.45 वाजता ही घटना घडली.
तक्रारीनुसार आरोपी अॅलेक्स इनॉक उर्फ रोनी, शेख सलमान शेख अशपाक आणि वाजीद टोपी यांनी रागातून नफिजवर हल्ला चढवला. सलमानने केस पकडून धरले, वाजीदने दांड्याने पायावर वार केला, तर अॅलेक्स उर्फ रोनीने धारदार चाकूने छातीवर सलग वार करून नफिजचा जागीच खून केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नफिजचा मृत्यू तात्काळ झाला.
हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले असले तरी, कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अल्पावधीतच सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या. रायपूर पोलिसांच्या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गुन्हा क्र.146/2025 भा.दं.सं. कलम 103(1), 3(5) नुसार गुन्हा दाखल असून तपास सपोनी निलेश सोळंके करीत आहेत.