बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा महाराजा ठरलेला व पात्रता नसतानाही भंडार विभागाचा ताबा मिळवलेला तत्कालीन कनिष्ठ लिपिक प्रकाश नामदेव बोथे अखेर बडतर्फ झाला. कोविड काळातील कोट्यवधींच्या खरेदी घोटाळ्याचा भडका उडाल्यानंतर विभागीय चौकशी समिती प्रमुखांनी अहवाल सादर करून बोथे याच्या गंभीर गैरव्यवहारांची चक्रावून टाकणारी माहिती दिली. तरीसुद्धा अकोल्याचे उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी आजवर कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत, हा प्रश्न जनतेसमोर उभा ठाकलाय.
लेखापरीक्षणात बोथे याने शासकीय निधीचा बेहिशोबी वापर, नियमबाह्य खरेदी, करारनामे न करता दिलेल्या ऑर्डर, अपूर्ण कागदपत्रे, जडसामानाची नोंद टाळणे, जीएसटी भरल्याचा तपास न करणे असे धक्कादायक प्रकार सिद्ध झाले. व्हेंटिलेटर, डायलेसिस मशीन, मोबाईल एक्स-रे, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटसारख्या खरेदीत कोट्यवधींची लूट उघडकीस आली.
चालक ते लिपिक असा प्रवास करत बोथेने भांडार विभाग हातात घेतला आणि चार वर्षांतच करोडोंची कमाई केली. विभागीय चौकशीत दोषी ठरून बडतर्फ झाल्यानंतर त्याची काळी कमाई व चल-अचल संपत्ती जप्त व्हायला हवी होती. मात्र, डॉ. भंडारी यांच्या कार्यालयात प्रकरण थंडबस्त्यात ठेवले गेले. अखेर हा भ्रष्टाचार झाकला जातोय की लपवला जातोय, असा संशय अधिक गडद होत आहे.शासनाच्या तिजोरीत जमा व्हायला हवे होते ते पैसे, पण बोथेच्या खिशात गेले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी पात्रता नसतानाही दिलेला भांडारपाल पदभार हीसुद्धा संशयास्पद बाब आहे. बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास कलंकित करणाऱ्या या घोटाळ्याचा निकाल आता कोण लावणार? जनता विचारतेय – करोडो रुपयांचा अपहार करूनही बोथेचे रक्षण कोण करत आहे?