बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव आणि 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. हे सण राष्ट्रीय उत्सव समजून एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज केले.
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड, राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यात गणेशोत्सव, ईद -ए-मिलाद यासह आगामी काळातील सण, उत्सव ‘हा आपला सण’ ही एकात्मतेची भावना ठेवून साजरे करावेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परस्परांप्रती एकतेची भावना ठेवावी. भरकटलेल्या तरुणांचे प्रबोधन करण्याची गरज असून समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घेवून तरुणांना मार्गदर्शन करावे. समाजमाध्यमांचा गैरवापर टाळावा. सण, उत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही, ही जबाबदारी समजून समाजबांधवांनी योगदान द्यावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाद-विवाद, अफवांना बळी पडू नये. सण, उत्सवाच्या काळात दारुबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले की, गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आनंदाने साजरा करावा. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची दक्षता घेण्यात येईल. सण, उत्सवाच्या दरम्यान समाजमाध्यमांवर अपप्रचार किंवा शांतता भंग करणारे आक्षेपार्ह संदेश, मजकूर रोखणे ही आपली जबाबदारी आहे. शांतता समितीच्या सदस्यांनी देखील यांची दक्षता घ्यावी. यासाठी आतापासूनच अंमलबजावणी सुरु करावी. तरुण मंडळींना योग्य मार्ग लावणे हे आपले काम असून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सण, उत्सवात प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे गरजेचे असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याच्या विविध भागातून उपस्थित झालेल्या शांतता समितीच्या सदस्यांनी सोयी -सुविधांबाबत सूचना मांडल्या. तसेच गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद या सण उत्सवात प्रशासनाच्या सोबत राहून एकोप्याने व शांततेने सण साजरे करण्यात येईल. या दरम्यान कोणत्याही प्रकारचे गाल-बोट लागणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, अशी भावना शांतता समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.
*बॉक्स*
जिल्ह्यात यावर्षी शहरी आणि ग्रामीण भागात एकूण 1385 संभाव्य सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामध्ये शहरी भागात 470 ग्रामीण भागात 925 गणेश मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. यापैकी 307 गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी देण्यात आली. पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दिली.
या सभेनंतर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी श्रीगणेशोत्सव समन्वय समितीची बैठक घेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश देवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.