बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाळूचा एकही अधिकृत घाट सुरू नसतांना देखील बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे.कधी प्रशासनाशी हात मिळवून तर कधी प्रशासनाची नजर चुकवून वाळू तस्करी सुरू असल्याचे चित्र रात्रीच्या वेळी पाहायला मिळते. अशाच एका टिप्परला बुलढाणा तहसील कार्यालयाच्या पथकाने पकडले असून टिप्पर मालकाला महसुलचा 2 लाख 64 हजार आणि परिवहन विभागाचा 80 हजार असा एकूण 3 लाख 44 हाजराचा दंड आकारण्यात आल्याची माहिती बुलढाणा तहसील प्रशासनाने आज 20 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता दिली आहे.
9 ऑगस्टला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू तस्करी बाबत प्रश्न उपस्थित केले असता ना. बावनकुळे यांनी वाळू तस्करावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले होते. अशात 15 ऑगस्टच्या रात्री बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांचे पथक वाळू तस्करावर कारवाई करण्यासाठी धाडच्या दिशेने जात असताना, दुधा परिसरातील मर्दळी घाटाजवळ जगदंबा मंदिरच्या रोडवर एक टिप्पर लपवून ठेवल्याचे त्यांचे लक्षात आले.या पथकातील मंडळ अधिकारी गणेश राऊत, रमेश पायघन तसेच वाहन चालक अशोक देवकर हे टिप्पर जवळ पोहोचले व पाहणी केली. दरम्यान विना रॉयल्टी वाळूची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले.सदर पथकाने टिप्पर जप्त करून बुलढाणा तहसील कार्यालयात आणले. टिप्पर मालक अमोल विजय सोनुने रा.दुधा याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करत त्याला 2 लाख 64 हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला आहे. सोबतच बुलढाणा तहसील कार्यालयाने आरटीओ ऑफिसला पत्र दिले व परिवहन विभागाने देखील 80 हजार रुपयांचा दंड या टिप्पर मालकाला आकारला आहे.या दुहेरी कारवाईमुळे बुलढाणा तालुक्यातील वाळू माफियामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.