बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश पावसाने शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचे पीक पाण्यात वाहून गेले, कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. अशा वेळी सरकार फक्त पंचनाम्याच्या नाटकात आणि बांधावर उभे राहून फोटोशेशन करण्यात व्यस्त असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.तुपकर म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. पंचनाम्याच्या नाटकांनी पोट भरत नाही. शेतकरी केवळ फोटोशेशनसाठी वापरण्याची वृत्ती आता सहन केली जाणार नाही.” शेतकऱ्यांचे झालेले शंभर टक्के नुकसान लक्षात घेऊन आठवडाभराच्या आत नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.
राज्यातील हजारो एकरांवरील पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पिके तर गेलीच पण उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “सरकारने आता बघ्यांची भूमिका सोडून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि त्याची जबाबदारी सरकारवरच राहील,” असे तुपकरांनी स्पष्ट केले.