देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा ! या दिवशी शेतकरी, पशुपालक आपल्या गायी, बैलांना आंघोळ घालून सजवून त्यांची गावोगावी मिरवणूक काढतात. यंदा मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे बैलांची मिरवणूक काढता येणार नाही. यंदा शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-राजाला सजवून गोठ्यातच पूजा करावी लागणार आहे. कारण लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या महिन्यात २२ तारखेला बैलपोळा आहे. मात्र जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या संसर्गामुळे जनावरांच्या मिरवणूक, यात्रा, बाजार आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकरी, पशुपालक आपल्या बैलांची सजवून गावोगावी वाजतगाजत मिरवणूक काढतात. मात्र, यंदा लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली असल्याने यंदाच्या पोळा सणावर लम्पीचे सावट आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-राजाला सजवून गोठ्यातच पूजा करावी लागणार आहे.
लम्पीला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र ढगाळ वातावरण, डासांचा प्रादुर्भाव यामुळे लसीकरण झालेल्या जनावरांमध्ये लंपीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. यामुळे जिल्हाधिकारी यांनी 18 ऑगस्टला आदेश काढून पोळा गोठ्यातच साध्या पद्धतीने साजरा करावा,पशुधन सार्वजनिक ठिकाणी नेऊ नये, असे सांगितले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.