बुलढाणा (हॅलो बुलढाणा) टूनकी ते वसाडी मार्गावरील असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना करण्यात आली असून, बांधकामात दिरंगाई होत असल्याने हा पूल नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. परिणामी पुलाच्या कामाची तात्काळ गुणवत्ता तपासणी करून अहवाल प्रसिद्ध करावा, दोषी कंत्राटदारावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी व देखरेख करावी आणि जनतेच्या सुरक्षेला धोका होणार नाही, याची खात्री करूनच पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी रेटण्यात आली आहे. दरम्यान 15 दिवसात समाधानकारक अहवाल प्राप्त न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे.
टुनकी ते वसाडी या मुख्य रोडवर पुलाचे बांधकाम सुरू आहे.हा पूल शेतकरी,व्यापारी, विद्यार्थी तसेच रुग्णांना आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच वाहनांच्या वर्दळीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र पुलाच्या बांधकामात सुरुवातीलाच निकृष्टपणा जाणवत आहे.या कामात अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे. दर्जेदार साहित्य न वापरता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने कंत्राटदाराची बेफिकिरी दिसून येत आहे.सदर कामात बांधण्यात आलेली रिटर्न वॉलही पूलाला सोडून बाहेरच्या दिशेने विलीन झालेल्या आहेत. भिंतीची दुरवस्था पाहून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारू शकत नाही. पावसाळ्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूल कोसळण्याचा गंभीर धोका आहे. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी पारदर्शीपणाने काम करण्याची मागणी एका तक्रारीद्वारे शेख सईद यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याकडे केली आहे. 15 दिवसाच्या आत सदर तक्रारीवर समाधानकारक अहवाल प्राप्त न झाल्यास कार्यकर्ते पुलावर आत्मदहन करणार, असा इशारा देखील देण्यात आला आहे.