बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अनेक वर्षांपासून तहानलेला बुलढाणा शहरवासीयांचा गळा अखेर ओला होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थाण राज्यस्तरीय नळयोजना अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या योजनेचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा कडक अल्टिमेटम कंत्राटदाराला आमदार संजय गायकवाड आणि नगरपालिकेकडून देण्यात आला आहे.
पाईपलाईनच्या पाच टप्प्यांपैकी तब्बल चार टप्पे पूर्ण झाले आहेत. उर्वरित टप्प्यासाठी जोरदार गतीने काम सुरू असून, शहरातील रस्त्यांवर खोदलेल्या ठिकाणी काँक्रीट पॅचेस मारण्याचे काम सुरु आहे. याचबरोबर नव्या पाइपलाइनची टेस्टिंग देखील सुरु करण्यात आली आहे. तब्बल 170 किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकून शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा केला जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना अपुरा, अस्थिर आणि वेळोवेळी खंडित होणारा पाणीपुरवठा सहन करावा लागत होता. उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहावे लागणाऱ्या बुलढाणेकरांसाठी ही योजना म्हणजे जीवनदायी ठरणार आहे. नगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, कंत्राटदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही तर कठोर कारवाई केली जाईल.आमदार गायकवाड यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, “दिवाळीपूर्वी बुलढाणेकरांच्या घराघरात गोड पाणी पोहोचलेच पाहिजे. नागरिकांची दिवाळी गोड झाली नाही, तर कंत्राटदाराची दिवाळी काळी करू.”
या घोषणेनंतर नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गोड पाण्याचा सततचा पुरवठा सुरू झाल्यास बुलढाणेकरांची दिवाळी यंदा खर्या अर्थाने गोड आणि आनंददायी होणार आहे.