चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील राऊतवाडी परिसरात 10 ऑगस्टच्या मध्यरात्री घडलेल्या घटनेने ग्रामस्थ संतापाच्या भरात आहेत. गोपाल चंद्रशेखर साखरकर यांच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेली, तोंडावर पांढऱ्या पट्ट्याची लाल रंगाची 3 वर्षांची गाय, अंदाजे 32 हजार रुपये किंमतीची, अज्ञात चोरट्यांनी निर्दयतेने पळवून नेली.
फिर्यादी यांनी 10 ऑगस्ट रोजी रात्री गाईंचे दूध काढून, चारापाणी करून त्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी चारापाणी करण्यासाठी गेल्यावर एक गाय गायब असल्याचे आढळले. आसपास शोध घेतल्यानंतरही गाय न मिळाल्याने त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात, सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेले तीन अज्ञात इसम गोठ्यात घुसून गायीला क्रूरपणे कारमध्ये जबरदस्तीने कोंबून भरधाव पळ काढताना स्पष्ट दिसतात.
ही घटना केवळ चोरी नसून प्राण्यांवरील क्रूरतेचे अत्यंत जिवंत उदाहरण असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भा. दं. सं. कलम 303(2), 281, 3(5) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत कलम 5(a), 5(b), 9, 11(1)(C), 11(1)(d) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक रहिवाशांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने आरोपींचा शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.