मेहकर (हॅलो बुलडाणा) शहरातील नामांकित बी.ए.एम.एस. डॉक्टर अमोल शेळके यांच्यावर व्याजखोर सनी काशिनाथ सांगळे याने गेल्या दीड वर्षापासून सतत जीवघेण्या धमक्या, शिवीगाळ व मारहाणीचे थरारक प्रकार घडवले आहेत.डॉ. शेळके यांनी हॉस्पिटलसाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी सांगळेकडून 3 लाख रुपये व्याजाने घेतले होते. परतफेडीमध्ये डिसेंबर 2024 पर्यंत नगदी 3,10,000 व फोनपेने 2,13,000 तसेच 17 महिन्यांतील 3,40,000 असे एकूण 8,63,000 रुपये दिल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. तरीही सांगळे 20 लाख रुपये व्याज बाकी असल्याचा खोटा आरोप करून धमक्या देत असल्याचे उघड झाले आहे.
19 मे रोजी घरात दारूच्या नशेत घुसून, 3 ऑगस्ट रोजी दवाखान्यात येऊन डॉक्टर व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ, मारहाण, काच फोडणे व 5 हजार रुपयांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप आहे. “एक महिन्यात पैसे न दिल्यास कुटुंबासह जीवंत जाळीन” अशी धमकीही देण्यात आली.12 ऑगस्ट रोजी पुन्हा मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने डॉक्टरांनी अखेर पोलिसात धाव घेतली. शेळके कुटुंब भीतीच्या छायेत असून, आरोपीविरुद्ध तातडीने कडक कारवाईची मागणी होत आहे.