देऊळगाव राजा (संतोष जाधव/हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील संत चोखासागर अर्थात खडकपूर्णा हा मोठा प्रकल्प दमदार पावसाने ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असून प्रकल्पात 84.45 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाची 3 वक्रद्वारे 10 सेमीने उघडण्यात आली.दरम्यान नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी महत्वपूर्ण असलेल्या संत चोखासागर प्रकल्प क्षेत्रात 9 व 10 ऑगस्ट रोजी दमदार पाऊस झाला.त्यामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असून,सध्या प्रकल्पात 84.45 टक्के एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाचा संकल्पित जलसाठा 93.40 दलघमि तर पूर्ण संचय पातळी 520. 50 मीटर आहे.प्रकल्पात सद्यस्थितीत 529 मीटर जलाशय पातळी असून, 78.88 दलघमि जलसाठा उपलब्ध आहे.दरम्यान प्रकल्पातील पाणी नदीकडच्या गावामध्ये शिरकाव करू शकते.त्यामुळे प्रकल्पाचे 3 वक्रद्वार उघडण्यात आले आहे.प्रकल्पात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही नियंत्रण कक्षाकडून केली जात आहे. दरम्यान नदीकाठच्या निमगाव गुरु, सावंगी टेकाळे, डिग्रस बु., डिग्रस खूर्द,टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागीले, निमगाव वायाळ,साठेगाव, हिवरखेड, राहेरी खूर्द, तडेगाव, राहेरी ब्रु., ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुंडा, लिंगा, खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.