देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/संतोष जाधव) कालच्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात 72 टक्के तर विद्रूपा प्रकल्पात 100 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. खामगाव तालुक्यातील रायधर लघु प्रकल्प देखील शंभर टक्के भरले आहे. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पात 81 टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने 9 ऑगस्ट रोजी दुपारी या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात नियोजित पाणी पातळी ठेवण्याकरिता धरणाचे 5 वक्रद्वार 20 सेमीने उघडण्यात आले आहे. 98.78 क्यूमेक निसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.दरम्यान नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील काही नदी नाल्यांना पूर आला.खडकपूर्णा प्रकल्प 72 टक्के भरले आहे. त्यामुळे खडकपूर्णाच्या काठाजवळील टाकरखेड भागिले, निमगाव गुरु,सावंगी टेकाळे,साटेगाव दिग्रस खुर्द,दिग्रस बुद्रुक,निमगाव वायाळ,हिवरखेड राहेरी खुर्द, राहेरी बुद्रूक,ताडशिवनी,देवखेड, कीर्ता, दुधा, सासखेडा, लिमखेडा,हनवतखेडा,उसवद,वझर सायखेड,तळेगाव, पिंपळगाव कुडा,लिंगा, खापरखेडा,सावरगावतेली, वाघाळा, टाकळखोपा, इचा, कानडी, देवठाणा,रायगाव, धानोरा बंजारा या गावातील सरपंच व सचिवांना तथा नागरिकांना देऊळगाव राजाचे तहसीलदार वैशालीताई डोंगरजाळ व खडकपूर्णा व्यवस्थापन उपविभाग सहाय्यक अभियंता देऊळगाव महीचे एस. जे. तल्हार यांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील विद्रूपा प्रकल्प 100 टक्के भरल्याने नदीकाठच्या गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. खामगाव तालुक्यातील रायधर प्रकल्प देखील 100 टक्के भरल्याने नदीकाठच्या लाखनवाडा, गवंढाळा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प 80.97 भरला असून याजलाशयाच्या पाणी पातळीतील वाढ पाहता नियोजित पाणी पातळी ठेवण्यासाठी धरणाचे 5 वक्रद्वार 20 सेमीने उघडण्यात आले आहे.याद्वारे नदीपात्रात 98.78 क्यूमेक (3489 क्यूसेक) विसर्ग सोडण्यात आला आहे.