बुलढाणा (हॅलो बुलडाणा/संदीप म्हस्के) जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सकाळपर्यंत कहर केला असून, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात तुफान पाऊस कोसळत आहे. देऊळगावराजातील असोला जहांगीर गावात परिस्थिती गंभीर झाली पावसाच्या पाण्याने गावातील अनेक घरात घुसखोरी केली असून, नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील धान्य, फर्निचर, कपडे यासह महत्त्वाचे साहित्य पाण्यात भिजून नष्ट झाले आहे. गावातील रस्ते नद्यांसारखे वाहू लागले असून, परिसरातील शेतजमिनींना तलावाचे रूप आले आहेत. शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- Hellobuldana